तुमची पहिली प्रसूतीपूर्व भेट ही तुमच्या गरोदरपणाच्या 6 ते 12व्या आठवड्यादरम्यान असते. या वेळेपर्यंत तुमच्या गरोदरपणाची लक्षणे पूर्ण भरात असतात. तुम्हाला मळमळ आणि उलट्या अशा सकाळच्या आजारांचा आधीच त्रास सुरू झालेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तुम्हाला सर्वात जास्त आराम आणि मोकळेपणा वाटेल अशा वेळेत ही भेट ठरवण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या पहिल्या भेटीमध्ये डॉक्टर तुम्हाला विचारू शकतील अशा गोष्टी.
तुमची गेल्या महिन्याची मासिक पाळी (एलएमपी) : तुम्हाला तुमच्या मागील महिन्यातील मासिक पाळीची तारीख विचारली जाईल जेणेकरून ईडीडी (बाळंतपणाची संभाव्य तारीख) ठरवता येईल.
तुमच्या आधीच्या प्रसूतीसंबंधीचा इतिहास : डॉक्टर तुम्हाला तुमच्या आधीच्या प्रसूतीच्या इतिहासाबद्दल विचारू शकतील, तसेच आधीचे जन्म, झालेले किंवा केलेले गर्भपात याविषयीही विचारू शकतील. यामुळे तुमच्या प्रसूतीपूर्व घ्यावयाच्या काळजीविषयी तसेच तुमच्या प्रसूतीविषयी नियोजन करण्यास डॉक्टरांना मदत होते.
टीबी, दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कावीळ, इत्यादींच्या वैद्यकीय इतिहासानंतरची माहितीही डॉक्टर विचारतील.
तुम्हाला एखाद्या औषधाची अॅलर्जी असेल तर तुमच्या डॉक्टरांना तसे स्पष्टपणे सांगितले पाहिजे, जेणेकरून अॅलर्जीमुळे झालेली गुंतागुंत टाळण्यासाठी ते औषधे लिहून देताना काळजी घेतील.
दोन्ही पालकांच्या आजारांचा इतिहास : होऊ घातलेली आई तसेच वडील यांना त्यांच्या आजारांच्या इतिहासाविषयी विचारले जाईल. बाळाच्या वाढीमध्ये याची लक्षणीय भूमिका असते. त्याबरोबरच, आईच्या आजाराच्या इतिहासावरून तिला असलेल्या जोखमीचे मूल्यमापन करता येईल.
कौटुंबिक आजाराचा इतिहास किंवा जनुकीय आजार : यामुळे वाढणाऱ्या गर्भाला असलेल्या संभाव्य धोके ओळखण्यात मदत होते. डॉक्टर तुम्हाला जे आजार होण्याची शक्यता सर्वात जास्त असते, त्यासाठी चाचणी करायला सांगू शकतात, जेणेकरून ते टाळण्यासाठी वेळेवरच प्रतिबंधात्मक उपचार घेता येतात.
वैद्यकीय तपासण्या : डाऊन्स सिन्ड्रोम आणि स्पायना बायफिडा अशा जनुकीय आजारांसाठीदेखील तुमच्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबामध्ये जनुकीय आजाराचा इतिहास असेल तर, असा काही धोका आहे का ते तपासण्यासाठी डॉक्टर तुम्हाला चाचण्या करायला सांगू शकतात. तुमच्या गरोदरपणाच्या 10-12 आठवड्यामध्ये तुमच्या प्लॅसेन्टाच्या अगदी लहानशा नमुन्यावर तुम्हाला सीव्हीएस ( कोरियॉनिक व्हायलस सँम्पलिंग) करायला सांगितली जाऊ शकते. तसेच गरोदरपणाच्या 16व्या आठवड्यात डॉक्टर तुमच्या गर्भाशयातील अॅम्नियॉटिक फ्लुइड सिरिंजद्वारे काढून घेऊन त्यावर अॅम्नियोसेन्ट्सिस करायला सांगू शकतात.
रक्ताच्या चाचण्या : तुम्हाला हिमोग्लोबिन, आरबीसीचे प्रमाण, रक्तगट, आरएच घटक, एचआयव्ही, हेपिटायटिस बी, व्हीडीआरएल, साखर, थायरॉईड चाचणी आणि इतर सामान्य कार्ये यांच्यासाठी रक्ताच्या काही चाचण्या देखील करायला सांगितले जाईल.
मूत्र चाचण्या : तुम्हाला चाचणीसाठी लघवीचा नमुना द्यायला सांगितला जाऊ शकतो, तुमच्या मूत्रामध्ये काही प्रथिने आहेत का किंवा अन्य काही संसर्ग आहे का ते तपासले जाईल.
अल्ट्रासाउंड स्कॅन : तुम्हाला तुमच्या गरोदरपणाच्या टप्प्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी, तसेच बाळंतपणाची संभाव्य तारीख (ईडीडी) काय असेल याचा अंदाज घेण्यासाठी तुम्हाला अल्ट्रासाउंड स्कॅन करायला सांगितले जाऊ शकते. यामुळे तुमच्या गर्भाच्या वाढीचीही तपासणी केली जाते.
जुळी बाळे ओळखण्यासाठी अल्ट्रासाउंड : आपल्याला जुळे गर्भ आहेत अशी तुम्हाला शंका असल्यास, अल्ट्रासाउंड स्कॅन जुळ्या गर्भांची वाढ दाखवून याची खात्री करू शकते. तुमचे डॉक्टर डॉप्लर हार्टबीट काउंटचा वापर करून जुळे हृदयाचे ठोके ओळखून याची खात्री करू शकतात.
रक्त दाब : तुमचा रक्तदाब तपासला जातो आणि गरोदरपणाच्या पुढील भेटींसाठी हा बेसलाईन संदर्भ म्हणून वापरला जातो.
तुमची उंची आणि वजन : तुमचे बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) मोजण्यासाठी डॉक्टर तुमची उंची आणि वजन याबद्दल माहिती घेऊ शकतात. तुमचा बीएमआय हा 30 पेक्षा जास्त असेल तर, गरोदरपणात मधुमेह होण्याचा संभाव्य धोका दर्शवतो. त्यामुळे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला उपाययोजना सुचवली जाऊ शकते.
तुमची जीवनशैली : तुमचे डॉक्टर तुमच्या जीवनशैलीची तपासणी करणार आहेत. तुम्ही धूम्रपान आणि मद्यपान करत असाल तर तुम्हाला ते सोडण्याचा सल्ला दिला जाईल. तुम्हाला अधिक सक्रिय करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. व्यायाम आणि आहार याविषयीही तुम्हाला टिपा दिल्या जाऊ शकतात.
मॅटर्निटी कार्ड तयार करा : तुमच्या भविष्यातील भेटींच्या वेळांचे नियोजन केले जाईल आणि तुमच्यासाठी मॅटर्निटी कार्ड तयार केले जाईल.
तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.
तुमचे गरोदरपण आणि आरोग्य याविषयी तुमच्या मनात असलेल्या शंका तुम्हीदेखील विचारू शकता. तुमच्या डॉक्टरांशी बोलण्यात संकोचू नका आणि तुमच्या शंका नेहमी स्पष्ट करून घ्या, मग त्या तुमचा आहार, व्यायाम, तुमचे आरोग्य किंवा तुमच्या बाळाच्या वाढीसंदर्भात असो.
तुम्ही निघण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची पहिली प्रसूतीपूर्व भेट ही अतिशय महत्त्वाची असते कारण या भेटीमध्ये डॉक्टर तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी प्राथमिक मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला वाटणाऱ्या चिंतांविषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. यामुळे तुमच्या स्थितीचे अचूक मूल्यमापन करण्यात मदत होते.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews